Ad will apear here
Next
दीपे दीप लाविला...


गीता सांगण्याचा प्रारंभ झाला तो प्रसंग आपल्याला सर्वांनाच सुपरिचित आहे. अर्जुनाच्या विनंतीनुसार भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ दोनही सैन्यांच्या मध्यभागी आणून स्थापन केला. कौरव-पांडवांची चतुरंग सेना एकमेकांच्या समोर उभी ठाकली होती. अनेक अतिरथी, महारथींच्या युद्धसिद्धतेचं निरीक्षण अर्जुन करत होता. त्या शत्रुसैन्यात आपलेच आप्तस्वकीय बंधू, काका, पितामह आणि गुरुजन यांना पाहून तो दिङ्मूढ झाला. मोहग्रस्त झाला. आणि त्या अवस्थेत अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलं. 

या अर्जुनाला कर्मयोग सांगण्यासाठी गीतेचा जन्म झाला... धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र अशा रणभूमीवर गीता सांगण्यास भगवान श्रीकृष्णांनी आरंभ केला. 

सर्व उपनिषदांचं सारतत्त्व असणारं गीतारूपी उपनिषद अठरा अध्यायांच्या आधारे अर्जुनाला सांगून पूर्ण झालं त्या वेळचा प्रसंग... एका कळसाध्यायातील अंतिम चरण... गीता सांगून पूर्ण झालीय... अशा या क्षणी माउली ज्ञानेश्वरीत एक प्रसंग रंगवतात... माउलींचा कृष्ण अर्जुनाला आता म्हणतोय, ‘अर्जुना, मी जे काही सांगितलं, ते तू एकाग्र चित्ताने ऐकलंस ना? तुझ्या कानांनी काय केलं? तुझ्या मनाने काय केलं? बुद्धीने काय केलं? धृतीने काय केलं? काय निर्णय घेतलास तू?’

तरीही अर्जुन काहीसा संभ्रमित... अजूनही निर्णयापर्यंत न आलेला... अजूनही निःशब्द...! ज्ञानयोगाची, कर्मयोगाची, बुद्धियोगाची सर्व रहस्ये सांगूनही अर्जुन अजूनही सचिंत का असावा? परमगुह्य असं ज्ञान सांगूनही अजूनही अर्जुनाचा मोह नष्ट का न व्हावा? अशा क्षणी एक प्रसंग घडतो. जो प्रसंग गीतेत नाही; पण ज्ञानेश्वरीत घडताना पाहता येतो. माउली ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द असे आहेत...

मग सावळा सकंकणु । बाहू पसरोनी दक्षिणु ।
आलिंगिला स्वशरणु । भक्तराजु तो ।।
हृदया हृदय एक जाले । ये हृदयीचे ते हृदयी घातले ।
द्वैत न मोडता केले । आपणा ऐसे अर्जुना ।।

ज्ञानदेव म्हणतात, अर्जुनाची ही संभ्रमित अवस्था पाहून कृष्णाने आपला उजवा हात पुढे केला. त्या सुंदर सावळ्या हातातलं सुवर्णकंकण क्षणभर लखलखलं. अर्जुन अनन्यभावे पुढे झाला मात्र, श्रीकृष्णाने त्याच क्षणी आपल्या लाडक्या अर्जुनाला कवळून आपल्या हृदयाशी धरलं आणि गाढ आलिंगन दिलं. जणू आपलं संपूर्ण हृदयसर्वस्व श्रीकृष्णाने अर्जुनाला या क्षणी देऊन टाकलं. कृष्णार्जुनांचं भिन्न भिन्न अस्तित्व जरी इतरांना दिसत असलं, तरी दोघांची हृदयं मात्र आता एकमेकांत निमाली आणि अद्वैताचा एक अखंड झरा त्यातून वाहू लागला. 

माउली म्हणतात -

ऐसे जे काही एक । बोला बुद्धीसीही अटक ।
ते द्यावया मिष । खेवाचे केले ।।

खेवाचे मिष, म्हणजे या आलिंगनाचे कारणच माउली इथे स्पष्ट करतात. श्रीकृष्णाच्या अमोघ वाणीचा आणि अर्जुनाच्या अपूर्व बुद्धीचा मनोज्ञ संगम गीता-उपदेशाच्या रूपाने घडून आला होता. परंतु माउली म्हणतात, त्या आत्मवस्तूपर्यंत पोहोचण्यास वाणीही अपुरी पडते आणि बुद्धीचाही शिरकाव न झाल्याने तीही असमर्थ ठरते. म्हणूनच ती आत्मवस्तू देण्याकरिता भगवंतांनी आता आलिंगनाचे निमित्त केले. दोघांची हृदये एक झाली आणि कृष्णाने आपल्या हृदयातील सारसर्वस्व असणारा अद्वैतबोध अर्जुनाच्या हृदयात प्रदीप्त केला. 

कसं दिसलं हे दृश्य? 

दीपे दीप लाविला । तैसा परिष्वंगु तो जाला ।
द्वैत न मोडता केला । आपणपै पार्थु ।।

एका दिव्याने दुसरा दिवा लावावा तसं हे दिसलं. एका दिव्याने दुसरा दिवा लावला; तरी दोनही ज्योती सारख्याच तेजाने प्रकाशतात. त्यात उणे अधिक उरत नाही. दोनही दिवे सारखेच दिसू लागतात. मग पहिला दिवा कोणता? आणि दुसरा दिवा कोणता? ओळखूही येत नाही तसं झालं. कृष्णार्जुनांचं आलिंगन तसं झालं. माउलींनी त्या एकरूपतेला परिष्वंगु असा सुंदर शब्द योजलाय. दोघांचीही हृदयं सारखीच प्रकाशमान झाली. अर्जुनाच्या हृदयातील संभ्रमाची, मोहाची काजळी निघून गेली आणि श्रीकृष्णाच्या हृदयातील तेजाने अर्जुनाचं हृदय प्रकाशून गेलं. 

दोन प्रकाशमान ज्योती तशाच राहिल्या; पण त्यांची आभा मात्र एकच होती. त्याप्रमाणे, कृष्ण कृष्णच राहिला आणि अर्जुन अर्जुनच राहिला. द्वैत राहिलं; पण अद्वैताची एकजिनसी दीप्ती दिसू लागली. 
 
घरातले अनेक दिवे परवा उजळवले. लामणदिवे, समया, निरांजनं आणि इतर अनेक... पण प्रकाश मात्र एकच होता... ते पाहताना ज्ञानेश्वरीतला हा हृद्य प्रसंग आठवला. कृष्णार्जुनांच्या मैत्रभावाची, ज्ञानोत्तर भक्तीची ही परमोच्च अवस्था आठवली. घरातले अनेक दिवे उजळलेले असताना हा हृदयसंवाद आठवला...! 

- डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IXZQCO
Similar Posts
अर्जुन विषादयोगाचं महत्त्व शांतपणे विचार करताना, अर्जुनविषाद हे गीतेचं ‘प्रयोजन’ आहे आणि अर्जुनावस्थेतल्या सर्वांना अंधारातून प्रकाशाकडे नेणं हे गीतेचं ‘साध्य’ आहे, हे ध्यानात येतं... आणि अशा वेळी, तुमच्या-माझ्यातल्या प्रत्येक अर्जुनासाठी एक कृष्ण निश्चित आहे, या विचाराने मन आश्वस्त होतं...
‘...परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो’ गीतेतील कृष्णापेक्षा माउलींचा कृष्ण अधिकच मनोज्ञ आहे... अर्जुनाच्या प्रश्नांवर उचंबळून येणारा, त्या सगळ्या प्रश्नांमुळे निर्माण होणारी आंदोलनं न सांगता जाणणारा... सख्या अर्जुनाच्या मनोरथाचे लगाम कधी खेचत... कधी सैल सोडत योग्य दिशेने नेणारा... त्यासाठी भरभरून बोलणारा...
आपण अर्जुनासारखा श्रोता व्हावं यासाठी... एखादा विषय प्रभावीपणे मांडण्यासाठी वक्त्याला अभ्यासाची, चिंतनाची बैठक असावी लागते. त्याला आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवांच्या आधारावर सूत्रबद्ध मांडणी करावी लागते. त्याप्रमाणे ‘ऐकण्यासाठीही’ तयारी असावी लागते. कसं ‘ऐकावं’ हे कळावं लागतं. यासाठी श्रोत्यालाही वक्त्याप्रमाणे काही पूर्वतयारी करावी लागते
तू भ्रमत आहासी वाया! तू वध करणारा आणि हे वध्य हे असे काही नाहीच... मुळातच विनाश पावणारी ही सृष्टी... ती अनित्य आहेच, सोन्यातल्या हिणकस द्रव्याप्रमाणे तिचा नाश अटळ आहे. त्यामुळे या नाशाचा कर्ता तू आहेस या भ्रमात तू राहू नकोस. तू भ्रमत आहासी वाया....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language